एक साप, कोंबडी, मांजर आणि शंभर पायांची गोम हे मित्र एकदा पत्ते खेळत बसले होते.
चौघेही पट्टीचे पत्तेबाज आणि तेवढेच फुकाडे- म्हणजे सिगारेटी फुंकणारे. तीन-चार तासांत होत्या नव्हत्या त्या सगळ्या सिगारेटी संपल्या.
तलफ आल्यावर साप कोंबडीला म्हणाला, ''जा ना पटकन तीन-चार पाकिटं घेऊन ये ना! मी गेलो असतो, पण मला तर पायच नाहीत.''
कोंबडी म्हणाली, ''मला दोनच पाय. मांजरबाई, तू जातेस काय?'' मांजर म्हणाली, ''मला तर चारच पाय आहेत. किती वेगाने जाणार मीही.
त्यापेक्षा या शंभर पायांच्या गोमाबाईंना जाऊ देत.'' गोम सिगारेट आणायला म्हणून गेली त्याला तास-दीड तास होता आला.
सगळ्यांना जाम तलफ आली होती. साप म्हणाला, ''पाच मिनिटांवर टपरी आहे, हिला इतका वेळ का लागला.''
कोंबडी गोमेला बघायला म्हणून बाहेर पडली आणि थक्कच झाली. बाहेरच्या खोलीत गोम बसली होती.
''तू अजून इथेच बसलीयेस?'' कोंबडीने रागाने विचारलं. '' बसलेली नाहीये नुसती. दिसत नाही का मी चपला घालतेय पायात ते!